पारनेर – तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तुकाई देवीच्या मंदिरात चोरट्यांनी चोरी करत देवीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम, असा एक लाख रुपयांपेक्षा जास्त ऐवज चोरुन नेल्याचे गुरुवारी सकाळी उघड झाले. याबाबत एकनाथ देवराम शेळके यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.
३० हजार रुपये किंमतीचा देवीच्या समोर ठेवलेला चांदीचा पुरातन मुखवटा एक किलो ग्रॅम वजनाचा,१५ हजार रूपये किंमतीचे अर्धा तोळे वजनाचे मंगळसूत्र सोन्याचे मनी व पळी असलेले देवीच्या मुखवट्यावरील दागिने, ५ हजार रूपये किंमतीचे एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथ देवीच्या मुखवट्यावरील, ५ हजार रुपये किमतीचे एक २५ भार वजनाची चांदीची देवीच्या मुखवट्यावरील कपाळपट्टी, १५ हजार रुपये किमतीचे एक ४० भार वजनाची चांदीची छत्री, १० हजार रुपये किमती,
एक ४० भार वजनाचे चांदीचे पैंजण, १० हजार रुपये किमतीचे एक अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मनी व पळी असलेले, ३ हजार रुपये किमतीचे २० भार वजनाचे चांदीचे पैंजण देवीचे गाभा-यातील लोखंडी कपाटात ठेवलेले होते. त्या कपाटातून दागिने काढून नेले. ३ हजार रुपये किमतीच्या २ सोन्याच्या नथ प्रत्येकी एक ग्रॅम, दोन दानपेट्यामधील ४ हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला.
सुपा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती कळतात सुपा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, गुन्हा शाखेचे आहेर, हेमंत थोरात यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. तसेच गुरुवारी दुपारी डाॅग स्काॅडच्या सह्याने शोध मोहिमेला सुरवात केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक वारुळे हे पुढील तपास करत आहेत.