जामखेड – येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचा २०२३चा संत तुकाराम साहित्य पुरस्कार कवी व लेखक प्रा. इंद्रजित भालेराव यांना घोषित केल्याची माहिती अध्यक्ष प्रा. आ. य. पवार व सचिव डॉ. शत्रुघ्न कदम यांनी दिली. हा पुरस्कार लेखक कवीच्या उत्कृष्ट वाङ्मयीन कार्यासाठी दिला जातो. रोख १० हजार, स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र व शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दि. १८ रोजी जामखेड येथे होणाऱ्या कवितांच्या ‘ चांदणझुला ‘ या कार्यक्रमात संत तुकाराम साहित्य पुरस्काराचे वितरण होईल, असे प्रा. मधुकर राळेभात म्हणाले. यापूर्वी गझलकार प्रा. तुकाराम पाटील, चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, कथा लेखिका डॉ.प्रतिमा इंगोले आणि अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार सदानंद देशमुख यांना संत तुकाराम साहित्य पुरस्कार देऊन गौरविले आहे.