संगमनेर – क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सहकारमहर्षी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संगमनेर शहरात १ जानेवारीपासून होत असून या क्रिकेट थरारासाठी मैदानाची जय्यत तयारी सुरू असून याची पाहणी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांनी केली.
सहकारमहर्षी चषक ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेची व नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. उत्तम दर्जाच्या संघाचा सहभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन व प्रचंड उत्साही प्रेक्षक ही या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस दोन लाख एक हजार रुपये आहे. आमदार बाळासाहेब थोरात व आ.सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी दरवर्षी किमान १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती लाभत असते.
2023- 24 हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त संगमनेर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य दिव्य स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल सज्ज झाले आहे. उत्कृष्ट नियोजनासह प्रेक्षकांची खास व्यवस्था, खेळाडूंची व्यवस्था आदी कामांसह स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या सामन्याचे उद्घाटन आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे व मान्यवरांच्या उपस्थितीत 1 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध आयपीएल खेळाडू व रणजी खेळाडू यांसह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार यांचा सहभाग हे आकर्षण ठरणार आहे.