कोपरगाव – जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण हवे असेल, तर मराठा समाजाने दहा वर्षे लंगोट वापरावी, असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले होते. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून कोपरगावच्या सकल मराठा बांधवांतर्फे लंगोट परिधान करून शेंडगे यांचा निषेध करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गेल्या आठ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. नुकतेच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरून बेताल वक्तव्य केले होते. त्यांचा निषेध म्हणून कोपरगाव येथील मराठा आंदोलक विनय भगत यांनी चक्क लंगोट परिधान करून प्रकाश शेंडगे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या, तसेच शेंडगे यांचा शेलक्या शब्दांत निषेध केला.
या वेळी अशोक आव्हाटे, अनिल गायकवाड, विकास आढाव, दीपक वाजे, बालाजी गोर्डे, रवींद्र कतले, रूपेश सिनगर, लक्ष्मण सताळे, साईनाथ नरोडे, सनील साळुंके, अजित कोताडे, आदी उपस्थित होते. लंगोट आंदोलन करून सकल मराठा बांधवांनी प्रशासनासह सर्वांचे लक्ष वेधले.
या वेळी अशोक आव्हाटे म्हणाले की, स्वतःला ओबीसींचे नेते म्हणवणारे प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाला दहा वर्षे लंगोट घाला मग आरक्षण देतो असे बोलणारे व आम्हाला आरक्षण देणारे हे शेंडगे कोण आहेत? आम्ही आरक्षण मागतोय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार मागतोय. जर आम्हाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी शेंडगे लंगोट घालायला लावत असतील, तर मग त्यांना एसटी आरक्षण हवे असेल तर मग ते कंबरेला झाडपाला बांधून फिरणार काय? शेंडगे यांनी दोन समाजांत तेढ निर्माण करू नये. सरकारने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे म्हणत आव्हाटे यांनी शेंडगे यांचा निषेध केला.