वडगाव मावळ – मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला देण्यात यावी, अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली. वडगाव मावळ येथे झालेल्या बैठकीत या आशयाचा ठराव मांडण्यात आला. कार्यकारिणीने हा ठराव बहुमताने मंजुर केला. त्यामुळे आता मावळात पुन्हा पार्थ पवार हेच लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कारके यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदार संघात अजित पवार गटाचे दोन आमदार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी मोठी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना कडवी झुंज दिली आहे. तर मावळ तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. घाटाखाली उरण, पनवेल आणि कर्जत विधानसभा मतदार संधावर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे यांचा विशेष प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला देण्यात यावा, अशी आग्रही मागणी या बैठकीत कण्यात आली.
आमदारांनीही केली आहे मागणी
मावळ लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला द्यावी, अशी मागणी यापूर्वी मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांनी केली होती. आपण स्वतः लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी केले होते. या जागेसाठी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले होते. त्यांच्या या मागणीनंतर पूरक अशी भूमिका मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकारी यांनी घेतली आहे.
गावभेट दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरु करावा: गणेश खांडगे
अजित पवार गटाने यापूर्वी गाठभेट दौरा करीत नागरिकांशी संवाद केला आहे. येत्या आठवड्यात गावभेट दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू करून नागरिकांशी संवाद साधण्याच्या सूचना तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिल्या आहे. या सूचनेचे स्वागत पक्षाचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके यांनी केले आहे.
मावळात पुन्हा पार्थ पवार ?
मावळ लोकसभेसाठी विद्यमान मंत्री आदिती तटकरे, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे, बापुसाहेब भेगडे या चार जणांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र अजित पवार गटाकडून पुन्हा पार्थ पवारच लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सध्या मावळात सुरू आहे.