पारनेर – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन चांगलेच पेटले आहे. आंतरवली सराटी येथे जरांगे पाटलांची “न भूतो न भविष्यती’ अशी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सभा झाली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पारनेर तालुका मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या संदर्भात 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टिमेट दिला आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ते ठरवणार आहेत. यामुळे आता पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने या आरक्षण आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता पारनेर या ठिकाणी पारनेरच्या तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.