पुणे – महापालिकेकडून “पीएमसी केअर’ तक्रार निवारण केंद्राच्या फसव्या कारभाराबाबत “महापालिकेचा “दगडी’ कारभार’ असे वृत्त देऊन पालिकेचा गैरकारभार उघड करण्यात आला होता. त्यानंतर संबंधीत प्रशासनाची मोठी धावपळ उडाली अखेर तातडीने चेंबरवरील झाकण बदलण्यात तसेच चेंबर पुन्हा फुटू नये म्हणून तेथे सिमेंटचे पक्के कामही करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील बुऱ्हानी कॉलनीजवळ रस्त्यावरील एक चेंबर धोकादायक स्वरूपात खचल्याचे तसेच अपघाताचा धोका असल्याची तक्रार सीटी आय संस्थेचे संजय शितोळे यांनी तक्रार निवारण प्रणीलीवर शुक्रवारी (दि.20) केली होती. त्यानंतर, त्यांना या प्रणालीवरून तक्रार नोंद क्रमांक आला. तसेच तुमची तक्रार सोडविण्यात आल्याचे कळविण्यात आले.
त्यामुळे शितोळे यांनी स्वत: ड्रेनेज झाकण तुटलेल्या ठिकाणी जावून पाहणी केली असता तुटलेल्या झाकणावरील छोटा दगड काढून तेथे मोठा दगड ठेवण्यात आला होता. सदर बाब “प्रभात’ने उघडकीस आणल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधीतांना चांगलेच धारेवर धरले तसेच चेंबर दुरूस्तीच्या सूचना केल्या त्यानुसार चेंबरवर झाकण टाकून सिमेंटचे कामही पक्क करण्यात आले आहे.
“दगडी’ कारभाराचा संताप…
तक्रार निवारण आणि इतर कामांसाठी वर्षाला जवळपास एक कोटींचा खर्च महापालिका प्रशासन करत असली तरी या तक्रार निवारण प्रणालीचा ढिसाळ कारभार “प्रभात’ने उघड केला. महापालिकेच्या या “दगडी’ कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.