नगर – मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबीचा इम्पिरिकल डेटा शोधण्याची मोहीम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. यात शुक्रवार (दि.17) अखेर तब्बल 94 हजार प्रमाणपत्रांच्या नोंदणी जिल्हा प्रशासनाच्या हाती आल्या आहेत. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदणी शोधण्यासाठी तब्बल 64 लाख कागदपत्रे तपासण्यात आली.
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आता ही मोहिम संपूर्ण राज्यात ही राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर नगर जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विभाग व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन केला असून या कक्षामार्फत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहाय्यक आयुक्ती (नगर पालिका प्रशासन), तालुकास्तरावर तहसीलदार वगटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
अशा पद्धतीने सुरू आहे शोधमोहीम
शासकीय विभागातील सर्व जुने कागदपत्र, रजिस्टर, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सहन वही. सातबारा उतारे, 1951 नमुना नंबर 1 नमुना नंबर 2, हक्क नोंद, जन्म-मृत्यू रजिस्टर गाव नमुना क्रमांक 14, शैक्षणिक अभिलेखे, प्रवेश निर्गम नोंदवही, जनरल रजिस्टर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अभिलेखे, नोंदवह्या, मळी नोंदवही, आस्थापना अभिलेखे, कच्चा कैद्यांची नोंद, पोलीस विभाग गाववारी, क्राईम रजिस्टर, अशी 1967 पूर्वीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.