बेंगळुरू – कॉंग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात कर्नाटकात बजरंग दल या संघटनेवर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याच्या विरोधात बजरंग दलाने गुरुवारी संपूर्ण कर्नाटकात हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पीएफआय या इस्लामिक कट्टरपंथीय संघटनेबरोबरच बजरंग दलावरही बंदीचे आश्वासन दिले आहे.
जाहीरनाम्यात कॉंग्रेसने जाती आणि धर्माच्या आधारावर समुदायांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. तथापी या आश्वासनावर बजरंग दलाने तीव्र प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की अशा प्रकारच्या घोषणा आपल्या धर्माला बाधा आणणाऱ्या आहेत.धर्म वाचवायचा असेल तर त्याच्या विरोधात प्रत्येकाने ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. विश्व हिंदू परिषदेनेही या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट येथे जाहीर सभेत बजरंग दलावर बंदी घालण्याच्या कॉंग्रेसच्या आश्वासनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात भगवान हनुमानाला बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला त्यांनी प्रभू श्री राम यांना बंदिस्त केले. आणि आता त्यांना ‘जय बजरंग बली’ म्हणणाऱ्या लोकांना त्यांना बंद करायचं आहे अशी शेरेबाजी मोदींनी केली आहे.