महादेवराव महाडिक – पी एन पाटील एकत्र ः एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत रंगणार मोठी चुरस
कोल्हापूर : कोल्हापूरात गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आज सुरू झाली. पालकमंत्री सतेज पाटलांच्या विरोधात कॉंग्रेसचेच आमदार पी एन पाटील गोकूळच्या रिंगणात उतरले आहेत. सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक महादेवराव महाडिक आहेत.
यंदाच्या गोकुळच्या निवडणुकीत पी एन पाटील हे महादेवराव महाडिक यांच्यासोबत गेले आहेत. यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. कोल्हापूर जिल्ह्याच राजकारणही याच गोकुळ भोवती फिरत असते. गोकुळची निवडणूक एप्रिल महिन्यात आहे.
परंतु आजपासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाली आहे. कारण गोकुळचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक आणि कॉंग्रेसचे आमदार पी एन पाटील यांनी गोकुळच्या कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क या मुख्य कार्यालयात एकत्र येऊन 2240 ठराव गोळा केले आहेत.
गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि कॉंग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्यात धुसफूस सुरू असल्याचं चित्र समोर आलं होत. अखेर मंत्री पद न मिळाल्याने नाराज असलेले कॉंग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचा सतेज पाटील यांच्या विरोधातला पहिला शड्डू ठोकला आहे.
सत्ताधा-यांविरोधात तीन संचालकांचे बंड
गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत असून आज तीन संचालकांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात दंड थोपटले आहेत. माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील, अरुणकुमार डोंगळे आणि संघाचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांनी एकत्र येऊन स्वतंत्ररीत्या सहायक दुग्ध उपनिबंधक यांच्याकडे ठराव दाखल केल्यामुळे सत्ताधारी गटाला जबर धक्का बसला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मोठी चुरस रंगणार आहे.