न्हावरे (प्रतिनिधी) – तब्बल दोन महिन्यांनंतर न्हावरे (ता.शिरूर) गावात करोनाचा शिरकाव झाला आहे. येथील शिक्षण क्षेत्रातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी इंदिरा डॅनियल यांनी दिली.
संबंधित व्यक्तीला सर्दी, खोकला व ताप याचा त्रास होत असल्यामुळे ती व्यक्ती येथील आशा कर्मचारी यांनी सर्वेक्षणादरम्यान केलेल्या मार्गदर्शनामुळे न्हावरे येथीलच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेली होती.
त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीमध्ये करोनाची काही लक्षणे आढळल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना शिरूर कोविड सेंटर येथे रविवारी(दि.१९) पुढील उपचारांसाठी हलवले होते. दरम्यान मंगळवारी (दि.२१) त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवला होता. त्याचा तपासणी अहवाल आज बुधवारी (दि.२२) सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे खबरदारी म्हणून न्हावरे गाव पुढील आदेश येईपर्यंत पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. करोना बाधित व्यक्तीच्या घरातील इतर सहा जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य आधिकारी इंदिरा डॅनियल यांनी दिली.