पिंपरी – पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन होऊन वर्षे झाली आहेत. परंतु अजूनही पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्वतःचे आयुक्तालय, मुख्यालय आणि परेड ग्राउंड मिळालेले नाही. पोलीस देहू येथील गायरानच्या जमिनीवर आयुक्तालय आणि मुख्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु देहूकरांनी केलेल्या विरोधानंतर आता पोलीस प्रशासन नरमलेल्या भूमिकेत दिसत आहे. पोलिसांनी आता मोशी येथे जागेची पाहणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, मुख्यालय आणि पोलीस परेड ग्राउंडसाठी मोशी येथील गायरान जमीन उपलब्ध करण्यासाठी महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस सहआयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, तहसीलदार अर्चना निकम, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पोलीस आयुक्तालय महापालिकेच्या चिंचवड येथील शाळेत सुरू आहे; तर तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालय निगडी येथे कार्यरत असून, या दोन्ही घटकांच्या कायमस्वरुपी इमारतीकरिता जागेचे शोध सुरुच आहेत. दरम्यान, तीर्थक्षेत्र देहू भूमीतील सर्वे नं. 97 या गायरान जमीन क्षेत्रातील 50 एकर क्षेत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देण्याचे हालचाली शासनाकडून होत असल्याने संत तुकाराम संस्थान व देहू नगरपंचायतीचे नगरसेवक नगरसेविका ग्रामस्थांकडून गायरान जमीन वाचविण्यासाठी 13 ऑक्टोबरला कडकडीत बंद पाळत टाळ मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर उपजिल्हाधिकारी संजय अस्वले व अप्पर तहसीलदार डॉ.अर्चना निकम यांना निवेदन देण्यात आले. परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांसह सर्वानीच कडकडीत बंद ठेवून मोर्चेला पाठिंबा दर्शविला होता. याशिवाय देहूकरांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेत याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती.
बंद पाडली होती मोजणी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व मुख्यालयाकरिता देहू गायरानची 50 एकर जागा उपलब्ध करुन देण्यास देहूकरांचा तीव्र विरोध आहे. काही दिवसांपूर्वी या जागेची शासकीय मोजणी ग्रामस्थांनी बंद पाडली होती. दिवसेंदिवस ही जागा देण्यास वाढता विरोध लक्षात घेत, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोशीच्या गायरान जागेचा पर्याय समोर आला आहे. या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आली आहे.
हालचालींकरिता मध्यवर्ती ठिकाण
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोशीत नागरीकरणाने वेग धरला आहे. अनेक गृहप्रकल्प याठिकाणी आकारास येत आहेत. तर देहू-आळंदी ही दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या मध्यभागी असलेल्या मोशीतून पिंपरी-चिंचवड, चाकण व तळेगाव एमआयडीसी याठिकाणी जलदगतीने पोहचण्यासाठी या भागातील प्रशस्त रस्त्यांचा प्रभावीपणे वापर करता येणे शक्य आहे.