पाथर्डी -शहरातील औषधे दुकानावर आंबा विक्री प्रकरणी झालेली सेटलमेंट प्रकरण दैनिक “प्रभात’ने उजेडात आणल्यानंतर अन्न औषध प्रशासनाची अनेक प्रकरणे आता चव्हाट्यावर आली असून त्यांची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी करंजी येथेही असाच प्रकार घडून दुकानदाराने खाण्याची शेव विकली म्हणून दुकानदाराला दीड पेटी खारी शेव वाटावी लागल्याची चर्चा आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या प्रकरणात थातूरमातूर कारवाई करून संबंधिताने सर्वांनाच हूल दिली.
शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातही दुकान तपासणी करून असाच प्रकार नुकताच घडला. व्यावसायिकांकडून अगोदर चूक होऊ द्यायची व नंतर धाड टाकून तोड करायची हा फॉर्म्युला सर्वांच्याच लक्षात आला आहे. मात्र डायरेक्ट परवानाच रद्द करू, अशी धमकीवजा समज दिली जाते. व्यवसायाचे नाव खराब झाले तर धंदा बुडेल.
धंदा बंद तर खायचे काय? असे अनेक प्रश्न उभे राहत असल्याने अनेक जण तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत आहेत. वरिष्ठांच्या मर्जीसाठी गोरगरिब व्यवसायिकांचा सापळा लावून बळी दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामध्ये खबऱ्यासह तडजोड माफिया आपली भूमिका सफाईदारपणे पार पाडत आहेत. नियमाला धरुन व्यवसाय करणारे नेहमीच येणाऱ्या तोड धाडीला वैतागले असून आपल्यावर आलेल्या दुकान तपासणीचा प्रसंग व्यथित करत आहेत.
आमरस तर सोडा साहेब अनेक पदार्थ पचवत असल्याचे किस्से समोर आले आहेत. दुकानला साधी भेट दिली तरी मदिरेची रंगीत संगीत पार्टी देऊन बिदागी द्यावी लागते. अवैध दारू, गांजा विकणाऱ्यांपेक्षाही वाईट अवस्था झाली आहे. जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या औषध विक्रेत्यांना दुकान तपासणीच्या नावाखाली मोठी आर्थिक तडजोड करावी लागत असेल तर दुकानामधून औषधेच विकली जातात का?असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते राम लाड यांनी उपस्थित केला आहे.
औषधे दुकानातुन आंबे विक्री केली म्हणून झालेली तडजोड धक्कादायक आहे. सोशल मीडियावरून जाहिरात देवून आंबे विक्री होत असतांना यंत्रणा जबाबदारी झटकत आहे.मिलीभगत करून प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. यातील काही पुराव्यांचा अभ्यास करून विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करू
राम लाड सामाजिक कार्यकर्ते.