पिंपरी (अँकर स्टोरी) – राज्यातील सर्व आस्थापनांना मराठी भाषेतील फलक बंधनकारक असताना, स्थानिक दुकानदारांकडूनच या आदेशाला हरताळ फासला जात आहे. नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादन विक्री दालनांवर इंग्रजींबरोबरच देवनागरी लिपीत मराठी भाषेतील नाव ठळकपणे झळकताना दिसत आहेत. तर स्थानिकांची रेस्टॉरंटस्, कापड विक्री दुकाने व अन्य आस्थापनांची नावे केवळ इंग्रजी भाषेत असल्याचे दिसून येत आहेत.
देशातील प्रत्येक राज्याने आपली अस्मिता जपली आहे. दक्षिणेकडील राज्यांमधील नागरिकांमध्ये तर पराकोटीचे मातृभाषाप्रेम दिसून येते. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या हिंदीमध्ये एखादी माहिती विचारल्यास या राज्यातील नागरिक तुमच्याकडे बघत देखील नाहीत. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. कार्यालयीन कामकाजदेखील मराठी भाषेत करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना आहे. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची बाब प्रस्तावित आहे.
दरम्यान, राज्यात व्यवसाय करणाऱ्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या, अनेक बडे ब्रॅंड, स्थानिक व्यापारी मराठीत दुकानाच्या नावाचा फलक लावण्यास टाळाटाळ करतात. एवढेच नव्हे तर केशकर्तनालय, लहान-मोठे स्टॉल्स, हॉटेल्सला देखील इंग्रजीचा मोह आवरता येत नाही. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरेंटमध्ये संपूर्ण मेनू कार्ड इंग्रजीतच असते. काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांसाठी केलेले आंदोलन राज्यभरात गाजले होतं. मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध शहरात दुकानांच्या पाट्या फोडल्या होत्या. महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या अनिवार्य करण्याची मागणी त्यावेळी मनसेने आक्रमकपणे लावून धरली होती. मनसेच्या आंदोलनानंतर अनेक शहरातील दुकानांवर मोठ्या अक्षरात मराठी पाट्या पहायला मिळाल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठी नामफलक गायब होऊन इंग्रजीने ती जागा पटकावली आहे.
नागरिकांच्या दरवाजावरही इंग्रजीच
फक्त व्यापारी, व्यावसायिकच नव्हे तर सर्वसामान्य मराठी नागरिक देखील आपल्या दरवाजावरील आपल्या नावाचा फलक इंग्रजीतच बनवून घेत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये दर्शनी भागात सदनिका नंबर आणि सदनिकाधारकाचे नाव असलेला फलक देखील इंग्रजीतच असतो. सोसायट्यांची नावे देखील इंग्रजी झाली आहेत. जी नावे मराठी आहेत, त्यांना देखील इंग्रजी लिपीतच लिहिले जाते.
दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत असाव्यात, यासाठी मनसेने राज्यभर आंदोलन छेडले होते. त्यानंतर मनसेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी, दुकानदार व व्यावसायिक संघटनांची भेट घेत, लवकरात लवकर दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत बदलून घेण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अद्यापही त्यावर कार्यवाही न करणाऱ्या दुकानदारांना धडा शिकविण्यासाठी मनसे पुन्हा रस्त्यावर उतरेल.
– सचिन चिखले, मनसे शहराध्यक्ष
मराठी पाट्यांबाबतचा निर्णय काय?
सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक लावतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.