मुंबई :- भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर काही वरिष्ठ खेळाडू क्रिकेटच्या एका कोणत्या तरी प्रकारातून निवृत्ती जाहीर करतील असे संकेत बीसीसीआयकडूनच मिळत आहेत. प्रमुख फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा, शिखऱ धवन, भूवनेश्वर कूमार या खेळाडूंबाबत सध्या ही चर्चा जोरात सुरु आहे.
गेल्या काही काळापासून धवन व भूवनेश्वरला भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेतील असे बोलले जात आहे. तसेच यंदाच्या मोसमात झालेल्या टी-20 सामन्यांतून रोहित व कोहलीनेही सातत्याने विश्रांती घेत नवोदितांसाठी जागा रीक्त केली आहे. त्यामुळे यंदाची एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा पार पडल्यावर रोहित व कोहली टी-20 क्रिकेटला रामराम करतील अशी चिन्हे आहेत.
भारतात ही स्पर्धा येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. त्यासाठी जेव्हा संघ निवड जाहीर केली जाइल व त्यात आपली नावे नसल्याचे समोर येइल त्यावेळी धवन व भूवनेश्वर आपला निर्णय जाहीर करतील असेही वर्तवले जात आहे. तसेच ही स्पर्धा संपल्यावर रोहित व कोहली कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळत राहून केवळ टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतील, अशीची चर्चा सुरु आहे.
धवनला एशियन गेम्ससाठीच्या संघातही स्थान देण्यात आलेले नाही. भारतीय संघ व्यवस्थापन आता नवोदितांसाठी जास्त संधी उपलब्ध करुन देत असल्याने तो लवकरच निवृत्तीची घोषणा करेल असे चित्र दिसत आहे. तसेच भारतीय संघव्यवस्थापनाने वेस्ट इंडीज दौऱ्यावर नवोदित मुकेश कुमारला सातत्याने संधी दिली आहे. तसेच शार्दुल ठाकूरही भारतीय संघातील स्थान राखून आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार निवृत्तीचा निर्णय घेइल असे बोलले जात आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 36 वर्षाचा आहे. तो भारतात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत नेतृत्व करणार आहे. मात्र या स्पर्धेनंतर तो देखील टी-20 ला रामराम करेल. दुसरीकडे कोहली जरी भारतीय संघातील सर्वात फिट खेळाडू असला तरी विश्वकरंडक स्पर्धेनंतर तो टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन एकदिवसीय व कसोटी क्रिकेटवरच जास्त लक्ष केंद्रित करेल असे सागितले जात आहे.
जडेजाही घेणार निर्णय?
जागतिक क्रिकेटमधील एक सर्वोत्तम अष्टपैलू असलेला भारतीय संघाचा रवींद्र जडेजा देखील विश्वकरंडक स्पर्धेनंतर आपल्या कारकीर्दीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जडेजा आता 34 वर्षांचा असून क्रिकेटच्या तीनही प्रकारात यापुढेही सातत्याने खेळणे कीती शक्य होइल असेच सध्यातरी त्याच्याबाबत चित्र दिसत आहे. त्यामुळे तो देखील एका प्रकारातून निवृत्ती घेण्याचे संकेत मिळत आहेत.