मध्यप्रदेश : पोटनिवडणुकांनंतर जनतेसह कॉंग्रेस दिवाळी साजरी करणार

कमल नाथ यांना सत्तेत परतण्याचा विश्‍वास

Madhuvan

भोपाळ – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांनी राज्याच्या सत्तेत परतण्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. विधानसभा पोटनिवडणुकांनंतर मध्यप्रदेशच्या जनतेसह कॉंग्रेस दिवाळी साजरी करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका होणार आहेत. त्यासाठी कॉंग्रेसने प्रचार मोहीम सुरू केली आहे. अशाच एका प्रचारसभेत बोलताना नाथ यांनी पोटनिवडणुकांत कॉंग्रेस बाजी मारेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

ते म्हणाले, भाजपने घोडेबाजाराच्या माध्यमातून मध्यप्रदेशात सरकार स्थापन केले. त्याबद्दल राज्याची जनता त्या पक्षाला धडा शिकवेल. तुम्हाला व्होट (मत) मिळवून आलेले सरकार हवे की नोट वापरून आलेले, असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला.

कॉंग्रेसमधील बंडखोरीमुळे नाथ यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे 15 महिन्यांचे सरकार मार्चमध्ये कोसळले. तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या 22 समर्थक आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मध्यप्रदेशची सत्ता पुन्हा मिळवण्याचा भाजपचा मार्ग सुकर झाला.

ज्योतिरादित्य समर्थक आमदारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांवरही पोटनिवडणुका होत आहेत. त्या जागा पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्याचा चंग कॉंग्रेसने बांधला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.