मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर येथे लता मंगेशकर नाट्यगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी कार्यक्रमात काळे कपडे परिधान करून येण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सरकारच्या या अनोख्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात काळे कपडे, काळा रुमाल, काळा पेन घेऊन येणाऱ्यांनाही प्रवेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जुन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या सभेलाही काळे कपडे, काळा मास्क, कुठल्याही प्रकारचे काळे कपडे परिधान करून येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यावेळीही या निर्णयाची सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही कार्यक्रमात काळे कपडे घालून येण्यास मनाई केल्याने निर्णयाची चर्चा रंगली आहे.