मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सोमवारी (दि.10) ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव दिले आहे. त्यानंतर आज या नावाने शिंदे गटाचे शाखा कार्यालय सुरु करण्यात आले आहे. शिंदे गटाचे हे पहिले कार्यालय मुंबईतील नेरूळ येथे उघण्यात आले आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा आणि माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. येत्या 3 नोव्हेंबरला अंधेरी येथील पोटनिवडणूक आहे यासाठी मोर्चेबांधणी देखील करण्यात येत आहे.
सोमवारी शिवेनेतील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून नवीन नावे देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आले असून शिंदे गटाला अद्याप चिन्ह मिळालेले नाही मात्र, तळपता सूर्य हे चिन्ह मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तळपता सुर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड हे पर्याय शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आली आहेत.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक नेते कार्यकर्त्यांनी मशाल या चिन्हाचे मशाल पेटवून अनावरण केले आहे. त्याचबरोबर 3 नोव्हेंबरला अधेरी येथे होणाऱ्या पोटनिवडणूकीत आमचाच विजय होईल असा विश्वास देखील ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे.