इस्तांबूल – अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर महिलांवर लादले जाणारे निर्बंध चर्चेचा विषय ठरत आहेत. अफगाणी पॉप स्टार आर्याना सय्यदने अफगाणिस्तानमधून पलायन करतानाचा एक थरारक अनुभव सांगितला आहे.
आर्याना सय्यद अफगाणिस्तानमधून पलायन करून सध्या इस्तांबूलमध्ये राहात आहे. मात्र, तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवला, तेव्हा आर्याना काबूलमध्येच होती. काबूलमधून बाहेर पडण्यासाठी आर्यानाने दोन वेळा प्रयत्न केला. दुसऱ्या प्रयत्नात एका लहानशा मुलीने केलेल्या मदतीमुळे तिला यश मिळाले.
आर्यानाने सांगितले की, तिने काबूल सोडण्याचा पहिला प्रयत्न 15 ऑगस्ट रोजी केला होता. याच दिवशी तालिबानने काबूलवर ताबा मिळवला होता. मात्र, ज्या विमानातून ती काबूल सोडणार होती, त्या विमानाने उड्डाणच केले नाही. त्यानंतर पुन्हा 16 ऑगस्टला तिने काबूल विमानतळ गाठले.
त्या दिवशी काबूल विमानतळावर भयंकर गर्दी होती. आम्ही विमानतळात प्रवेश देणे सुरू होण्याची वाट पाहात होतो. त्याचवेळी माझ्या मांडीवर एक लहानगा येऊन बसला. हीच संधी साधून मी प्लान केला. मी त्या मुलाला सांगितले की जर आपल्याला थांबवले, तर तू फक्त त्यांना सांगायचे की मी तुझी आई आहे आणि माझे नाव आर्याना नसून फ्रेश्ता आहे. नशीबाने साथ दिली आणि अमेरिकी सैनिकांनी त्यांना विमानात जाऊ दिले, असे तिने सांगितले.
दरम्यान, आर्यानाने अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या हस्तक्षेपाविषयी वारंवार आक्षेप नोंदवला आहे. शिवाय, नुकत्याच जाहीर झालेल्या तालिबानी मंत्रिमंडळावर सर्वसमावेशक नसल्याची टीकाही तिने केली आहे.