पुणे – राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी मुलांच्या प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे. त्यामुळे शाळांनी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारु नयेत, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी काढले.
शाळा प्रवेशासाठी मुलांचे किमान वय निश्चित करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 18 सप्टेंबर 2020 रोजी निर्णय जाहीर केला. त्या अनुषंगाने काही पालकांनी शासनाकडे निवेदने पाठविली. संबंधित शासन निर्णय हा शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून लागू करण्याऐवजी 2022-23 पासून लागू करण्याची मागणी होत आहे.
पालकांची इच्छा असल्यास 3.5 ते 4.5 वय असणारी मुले ज्युनियर केजी (एलकेजी) मध्ये प्रवेश घेवू शकतात. शासन निर्णय मुख्यत: इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी लागू राहणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये वयाची 6 वर्षे पूर्ण होणाऱ्या बालकास 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीमध्ये प्रवेश घेता येणार आहे, असे स्पष्ट केले आहे.