वॉशिंग्टन : सर्वसाधारणपणे कोणतीही पदवी मिळवण्यासाठी वयाची वीस वर्षे पार करणे आवश्यक असते पण कॅलिफोर्नियातील एका विद्यार्थ्याने मात्र पराक्रम केला असून त्याने वयाच्या 17 व्या वर्षी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
तुलारे डिस्ट्रिक्ट ॲटर्नी ऑफिसने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून पीटर पार्क नावाच्या विद्यार्थ्याने वयाच्या 17 व्या वर्षीच बारची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे त्यांनी या परिपत्रकात म्हटले आहे. अशा प्रकारची परीक्षा उत्तीर्ण होणारा पीटर पार्क हा सर्वात लहान विद्यार्थी आहे की नाही याबाबत आम्हाला कल्पना नाही पण त्याने वयाच्या 17 व्या वर्षीच वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
त्याने वकील म्हणून काम करण्याची अधिकृत शपथही घेतली आहे. पीटर पार्कने यावर्षीच्या जुलै महिन्यामध्ये परीक्षा दिली होती. नोव्हेंबरमध्ये या परीक्षेचा निकाल लागून त्याला या परीक्षेत चांगले यश मिळाल्याचे लक्षात आले. वयाच्या 13 व्या वर्षापासूनच पीटर पार्कने पदवी परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता.
नॉर्थ वेस्टर्न कॅलिफोर्निया यूनिवर्सिटी मध्ये त्याने हा चार वर्षाचा वकिलीचा अभ्यासक्रम सुरू केला होता आणि त्यामध्ये कोणताही अडथळा न येता वयाच्या 17 व्या वर्षी हा अभ्यासक्रम पूर्ण करून वकील होण्याचा मान मिळवला डिस्ट्रिक्ट ऍटर्नी कार्यालयाने त्याला गेल्या महिन्यात शपथ देऊन अधिकृतरित्या वकील म्हणून सामावून घेतले आहे.