बेंगळुरु – “चांद्रयान-3’च्या यशानंतर इस्रो आता “आदित्य-एल1′ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली आहे. आदित्य-एल1 मोहीमे अंतर्गत सूर्याचा अभ्यास करण्यात येणार असून ही भारताची पहिली सौरमोहीम असणार आहे.
आदित्य-एल1 हे श्रीहरीकोटा येथील लॉंच पॅडवर सज्ज झाले आहे. येत्या 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य-एल1चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
यासंदर्भात इस्रोने ट्वीट करत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये आदित्य -एल1चे फोटो देखील इस्रोने ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,
पीएसएलव्ही-सी 57 या रॉकेट हे आदित्य-एल1 अवकाशात घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले असून श्रीहरीकोटा येथील दुसऱ्या लॉंच पॅडवरून प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज झाले आहे.
सूर्याचा अभ्यास करणार
आदित्य-एल1चे प्रक्षेपण केल्यानंतर हा उपग्रह सुमारे चार महिने अंतराळात प्रवास करणार असून सूर्य आणि पृथ्वीमध्ये असणाऱ्या एका लॅंग्रेज पॉइंटवर आदित्य-एल1 हा उपग्रह ठेवण्यात येणार आहे.
आदित्य-एल1 या मोहिमेतून इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. यातून सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, कॉस्मिक रेज, सौर वादळे आणि अन्य गोष्टींचा अभ्यास करणे हे इस्रोला शक्य होणार आहे.