मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीला जवळपास 2 महिने झालेत. पण राष्ट्रवादी सत्तेत आहे की विरोधात? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शरद पवारांसह अनेक नेत्यांनी पक्षात फूट पडलीच नसल्याचा दावा केल्यामुळे ही पवारांचीच खेळी असल्याचा दावा केला जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांची एक खासियत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दंतकथा तयार होत असतात. त्या कथा लोकप्रियही होतात. मग काही भक्तांना जगात जे काही चालते, ते शरद पवारच चालवतात, असे वाटते. मला शरद पवारांविषयी आदर आहे. पण त्यांच्या भक्तांना असे वाटते.
शरद पवार ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यामुळे अजित पवार गरजेनुसार त्यांचा सल्ला घेतात. कधी कधी ते आम्हालाही सल्ला देतात. यावेळी त्यांनी 2024 ची सार्वत्रिक व विधानसभा निवडणूक शिंदे व अजित पवारांच्यासोबत लढवणार असल्याचेही स्पष्ट केले. सध्या आम्ही तिघे अत्यंत भक्कमपणे एकत्र आहोत. आम्ही 2024 ची लोकसभा व विधानसभा निवडणूकही एकत्र लढू. निवडून येवू. आमच्या जागांत आणखी भर पडेल, असे फडणवीस म्हणाले.