Aditya-L1 Mission : इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवलेल्या आदित्य एल-1 आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आदित्य एल-1 हे उद्या म्हणजे 6 जानेवारी 2024 रोजी एल-1 बिंदूवर पोहोचणार आहे, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेच्या हवाल्याने देण्यात आली आहे. 2 सप्टेंबर 2023 मध्ये इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 हे अंतराळात झेपावले होते.
आदित्यकडून एल–1 वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे. व्हीईएलसीची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित व्हीईएलसी सूर्याचे एचडी फोटो घेईल. एल-1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील.
म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. त्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल. या दरम्यान, आदित्यवरील सर्व उपकरणे सुरळीतपणे सुरू आहेत की नाही, याची चाचणीदेखील इस्रोकडून करण्यात येणार आहे.
आदित्य एल-1 मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे, जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षात टिकू शकेल. आदित्य एल-1ची रचना खास प्रकारे करण्यात आली आहे, ते सूर्याच्या फार जवळ जाणार नाही, पण लॅरेंज पॉईंटवर राहील आणि सूर्यावर संशोधन करेल. आदित्य एल-1 ही एक प्रकारे स्पेस टेलिस्कोप आहे, जी स्पेसमध्ये खास पद्धतीने काम करेल.