शिरूर येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गारटकर यांचे प्रतिपादन
न्हावरे- ऍड. अशोक पवार हे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीने मतदारसंघात नवचैतन्य आले आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
शिरूर-हवेली मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी गुरुवारी (दि. 3) उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्णी शिरूर बाजार समिती येथे झालेल्या सभेत अध्यक्षस्थानावरून गारटकर बोलत होते. याप्रसंगी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली नागवडे व शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील सर्व प्रमुख,आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीप गारटकर म्हणाले की, सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते यांनी ऍड. अशोक पवार यांना उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीकडे मागणी केली होती. त्यामागणीनुसार शरद पवारांनी उच्चशिक्षित, अभ्यासू व सर्वसमावेशक उमेदवार म्हणून ऍड. पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डोके शांत ठेऊन आपापले बूथ सांभाळावेत. तसेच प्रत्येक मतदारापर्यंत जास्तीत जास्तवेळा पोहोचून सर्वाधिक मतदान राष्ट्रवादी करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
राष्ट्रवादीमध्ये सामान्य कार्यकर्त्यापासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना योग्य संधी दिली जाईल. त्यासाठी सर्वांनी इकडे-तिकडे न फिरता आपापल्या बुथचे योग्य प्रकारे नियोजन करावे. तसेच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून राष्ट्रवादीची विचारधारा पाहोचवावी. विधानसभा लढवण्यासाठी जे इच्छुक होते. त्यांचाही पक्षात आदर केला जाईल व त्यांनाही योग्य संधी देऊ, असे गारटकर यांनी नमूद केले.
- अर्ज दाखल करण्यासाठी ऐतिहासिक गर्दी
शिरूर-हवेली मतदाररसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, त्या आधी त्यांनी काढलेली रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीप्रसंगी झालेली गर्दी ही ऐतिहासिक होती अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.