नवी दिल्ली – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पुनावाला यांना संपूर्ण भारतात सुरक्षाकवच लाभेल. त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनात असतील.
सीरमकडून कोविशिल्ड या करोनावरील लसीचे उत्पादन केले जात आहे. त्यामुळे पुनावाला यांची व्यापक प्रशंसा होत आहे. त्याचवेळी लसीचा चढा दर ठेऊन सीरम नफेखोरी करत असल्याचा आरोपही काही घटकांकडून होत आहे. त्यापार्श्वभूमीवर, सीरमकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र पाठवण्यात आले. लस पुरवठ्यावरून विविध गटांकडून पुनावाला यांना धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्या पत्रातून करण्यात आली.