मुंबई – ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंतवा’ या गाण्याने खळबळ माजवणारी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नेहमीच तिच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असते. याआधी नागा चैतन्यसोबत लग्न आणि काही वर्षातच घटस्फोटामुळे ती चर्चेत आली होती. सध्या ‘मायोसायटिस’ या आजारामुळेही ती त्रस्त आहे. 2022 साली सोशल मीडियाद्वारे तिने तिच्या आजाराबाबत सांगितले होते. यावेळी तिने तिचा हॉस्पिटलमधील फोटो देखील शेअर केला होता. मात्र आता समंथाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर आली आहे.
समंथा अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याचे म्हंटले जात आहे. निर्मात्याचे पैसेही तिने परत केले असल्याची चर्चा आहे. समंथाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘समंथा कामातून एक वर्षाचा ब्रेक घेत आहे. यादरम्यान ती कोणतीही नवी तेलुगू किंवा बॉलिवूड फिल्म साईन करणार नाही. या वेळेचा उपयोग ती आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आणि उपचारासाठी करणार आहे. समंथाने निर्मात्यांनी दिलेले आगाऊ पेमेंटही परत केले आहे.’
दरम्यान, समंथा रुथ प्रभू ‘शाकुंतलम’ सिनेमातही दिसली. त्यानंतर आता ती लवकरच ‘सिटाडेल’ ही सिरीज रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. तर तिचा आणि विजय देवरकोंडाचा ‘खुशी’ सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्या काही काळासाठी संमथाने अभिनयातून ब्रेक घेतल्याचे म्हंटले जात आहे.