पिंपरी, दि. 16 – चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये गुणवत्तेच्या जोरावर नक्कीच कामे मिळतात. त्यासाठी कोणत्याही चुकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते, असे मत अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने गुरूवारी चिंचवड येथे व्यक्त केले.दिशा सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने आकुर्डी व चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात प्रियदर्शनी हिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिग्दर्शक विश्वास जोशी, माजी महापौर अपर्णा डोके, दिशाचे अध्यक्ष जगन्नाथ ऊर्फ नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, सचिन साठे, अविनाश ववले, एनआयबीआरच्या प्राचार्या मृदुला गायकवाड, ब्लॉसम शाळेच्या प्राचार्या शारदा भूषण आदी उपस्थित होते.
प्रियदर्शनी म्हणाली की, आपल्या मनात नाकारले जाण्याची (रिजेक्शन) भीती असता कामा नये. गुणवत्ता असलीच पाहिजे व त्यासोबत आत्मविश्वासही असला पाहिजे. तुमच्यातील विश्वास दिसला की गुणवत्ताही दिसून येते.
अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले. संतोष बाबर यांनी आभार मानले.