नवी दिल्ली – दोनशे कोटी रुपयांच्या एका कथित घोटाळ्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही हिची काल दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांनी आपल्याला क्लीन चीट दिल्याचा दावा नोराने केला आहे. तसे निवेदन तिच्यावतीने जारी करण्यात आले आहे.
त्या निवेदनात तिने नमूद केले आहे की दिल्ली पोलिसांनी आपली चौकशी केल्यानंतर या प्रकरणात आपला काही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनीच नमूद केले आहे. गुरुवारी तिची पोलिसांनी सहा तास चौकशी केली होती.
सुकेश चंद्रशेखर या मुख्य आरोपीने केलेल्या गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचा आरोप होता. सुकेश चंद्रशेखर हा खंडणी वसुली आणि मनि लॉंड्रिंगच्या प्रकरणातील आरोपी आहे. याच प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस ही सुद्धा आरोपी असून तिचीही या आधी चौकशी करण्यात आली आहे.