मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून किशोर कुमार यांच्या बायोपिकबाबतची जोरदार चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरु आहे. अशात अभिनेता रणबीर कपूरने याबाबत माहिती दिल्याचे समोर आले. रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे आणि लोक त्याच्या अभिनयाचे मोठे चाहते आहेत. संजू सारख्या बायोपिकमधून रणबीरने आपला अभिनय सिद्ध देखील केला आहे.
रणबीरने स्वतः एका मीडिया हाऊसशी बोलताना किशोर कुमार यांच्या बायोपिकबाबत भाष्य केले आहे. ‘तू झूठी मै मक्कार’ हा रणबीरचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीरसोबत श्रद्धा कपूर देखील आहे. यानंतर रणबीरचा आगामी चित्रपट कोणता असणार याबाबतची सर्वांना उत्सुकता लागलेली असताना रणबीरने अनेक वर्षांपासून रखडलेल्या एका बायोपिकचा उल्लेख केला आहे.
‘तू झूठी मै मक्कार’च्या प्रमोशनदरम्यान रणबीरला किशोर कुमार यांच्या बायोपिक बाबत विचारण्यात आले. या चित्रपटात काम करणार असल्याचे यावेळी त्याने सांगितले. तसेच गेल्या अकरा वर्षांपासून तो दिग्दर्शक अनुराग बासूसोबत यासंदर्भात काम करत आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे आणि संजू नंतरचा दुसरा बायोपिक असणार असल्याचे देखील रणबीरने यावेळी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून रणबीर सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार अशा चर्चा होत्या. मात्र यावेळी रणबीरने अद्याप आपल्याकडे अशी कोणतीही ऑफर न आल्याचे देखील यावेळी स्पष्ट केले. यासोबतच रणबीर ब्रम्हास्त्रच्या दुसऱ्या पार्टमधे देखील दिसणार आहे.