मुंबई – ‘द काश्मीर फाइल्स’ हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या वर्षी 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. यावेळी देशभरातून या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय पटलावर नेत्यांनी आपल्या भाषणात त्याचा अनेकदा उल्लेख केला, समाजमाध्यमांवर अनेक मते नोंदविण्यात आली.
अनेकांना चित्रपटाच्या तिकिटासाठी झगडावे लागले. 1990 मधील काश्मिरी हिंदूंचे पलायन या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्या हत्याकांडाची कहाणीही सांगितली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दरम्यान, या चित्रपटात फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका साकारणार मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरचा नुकताच एक मोठा सन्मान करण्यात आला आहे. चित्रपटात चिन्मयने अतिशय उत्तम पद्धतीने बिट्टाची भूमिका साकारली होती. या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले. त्याच्या याच भूमिकेसाठी त्याला ‘झी सिने पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आलं आहे.
झी सिने पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट नकारात्मक पात्र’ पुरस्कार देऊन चिन्मयला गौरवण्यात आले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यावेळी चिन्मयने मराठीत आभार मानत महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मनं जिंकली आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेते गुलशन ग्रोव्हर, सनी देओल आणि अभिनेता बॉबी देओलच्या हस्ते चिन्मयला पुरस्कार दिला जात असल्याचे दिसत आहे. तसेच, तो पुढे म्हणतो… “खूप खूप धन्यवाद… द कश्मीर फाइल्सच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानू इच्छितो.
तसेच झी सिने अॅवॉर्डचेही खूप खूप आभार. दोन मुलं, एक पत्नी आणि चार श्वान हे आज फार आनंदात असतील. माझा हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबासाठी समर्पित करतो. तुम्हा सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद..!’ अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली आहे.