मुंबई – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर प्रसिद्धी झोतात आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जीवनात लवकरच बायोपिक येणार आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली आहे. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. आर्यन खान प्रकरणानंतर देखील त्यांच्या पदावरून चांगलीच चर्चा सुरु होती.
समोर आलेल्या माहितीनुसार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक ‘मैं अटल हूं’च्या निर्मात्यांपैकी एक असलेले झीशान अहमद यांनी वानखेडे यांचयवर आधारित बायोपिकच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आहे. तसेच या चित्रपटाच्या लेखन टीममध्ये एक महिला टीव्ही जर्नलिस्टचे देखील नाव असणार आहे. या महिला पत्रकार आर्यन खान प्रकरणादरम्यान वानखेडे यांच्या संपर्कात होत्या.
समीर वानखेडे यांचा बायोपिक लिहिणाऱ्या प्रीतम झा यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटात वानखेडे यांच्या आयुष्याशी संबंधित ते पैलू सांगण्यात येणार आहेत, ज्यांबद्दल अजूनही लोकांना माहिती नाही. चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या कास्टिंगचे काम सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे.
वानखेडे हे मोठे अधिकारी आहेत त्यासोबत त्यांनी केलेल्या कामाची नेहमीच चर्चा असते. त्यामुळे त्यांच्यावरील बायोपिकमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच वानखेडे यांची भूमिका नेमका कोणता अभिनेता साकारणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.