बेंगळुरू – कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमारचे वयाच्या 46व्या वर्षी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली होती. पुनीतला जावून अनेक दिवस उलटले. तरी त्याच्या चाहत्यांची त्यासाठी असलेली ओढ कणभरही कमी झाली नसल्याचं चित्र आहे.
चाहते अजुनही पुनीतच्या अशा अकाली जाण्याने खचून गेले असून अद्याप सावरले नाहीत. आता पुनीत यांच्यासोबत ‘युवारथना’ या सुपरहिट चित्रपटात काम करणारे निर्माते संतोष आनंदराम यांनी पुनीत यांच्या बायोपिक विषयी वक्तव्य केले आहे.
संतोष यांना सोशल मीडियावर एका चाहत्याने पुनीत कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची विनंती केली होती. त्या चाहत्याला उत्तर देत त्यांनी ‘पुनीतचा बायोपिक पडद्यावर आणण्यासाठी मी माझ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करेन’ असे म्हटले आहे.
पुनीतचे वडील राजकुमार हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे आयकॉन होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले अभिनेते होते. चंदन तस्कर वीरप्पन याने जुलै 2000 मध्ये तामिळनाडूतून त्यांचे अपहरण केले होते. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती, त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.