पिंपरी -प्रसिद्ध लेखक, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने कलागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येत्या शनिवारी (दि. 16) सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.
माजी शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर हे चिन्मय मांडलेकर यांची नाट्य व चित्रपट सृष्टीतील वाटचालीविषयी प्रकट मुलाखत घेणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील लेखक व दिग्दर्शक आकाश थिटे, थिएटर आर्टिस्ट रश्मी घाटपांडे, संगीतकार तेजस चव्हाण, गायक निषाद सोनकांबळे, रविंद्र कांबळे, अभिनेत्री प्रगल्भ कोळेकर यांना या प्रसंगी कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
कार्यक्रमाला आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यवाह डॉ. प्रवीण दाबडघाव, पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.