मुंबई – अभिनेता अंकित मोहनने भरदार शरीरयष्टी, जबरदस्त स्टंट आणि त्याच्या दमदार अभिनयातून ‘फर्जंद’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल होत. आता पुन्हा एकदा आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे पोस्टर शेअर केले आहे.
शिवाजी महाराजांच्या शूर आणि विश्वासू सरदारांपैकी एक असणाऱ्या ‘येसाजी कंक’ यांची महत्त्वाची भूमिका अंकित साकारणार आहे.’येसाजी कंक’ यांना ‘शिवबाचा ढाण्या वाघ’ म्हणून ओळखले जाते. मदमस्त हत्तीलाही आपल्या शौर्याने काही क्षणांत लोळवणाऱ्या येसाजी कंक यांचे स्वराज्यनिर्मितीत बहुमूल्य योगदान राहिले असल्याची महती इतिहासात वर्णलेली आहे.
दरम्यान, अंकितला अॅक्शनची प्रचंड आवड असल्याने चित्रपटातील अॅक्शन्स सीन स्वत: करण्यासाठी अंकित आग्रही असतो. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अंकित म्हणाला, ‘कोंडाजी फर्जंद’च्या यशानंतर ‘येसाजी कंक’ यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला मिळण हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझा हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडेल’, असा विश्वास अंकित व्यक्त करतो.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर आणि अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. १५ नोव्हेंबरला ‘फत्तेशिकस्त’ प्रदर्शित होणार आहे.