Manoj Jarange| मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांनी बुधवारी राज्य सरकारला इशारा दिला की, उपोषणादरम्यान आपला मृत्यू झाला तर ज्या प्रकारे हनुमानाने लंकेला आग लावली होती त्याप्रमाणे मराठा समाज महाराष्ट्र पेटवून देतील. जरांगे यांचे बेमुदत उपोषण बुधवारी पाचव्या दिवशीही सुरूच आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. डाॅक्टरांकडून उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे.
मराठा समाजाचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटात समावेश करण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
औषध न घेतल्याने जरांगेंची प्रकृती खालावली –
जरांगे पाटील ना पाणी पीत आहेत ना औषधे घेत आहेत. कुणबी मराठा समाजाच्या ‘नात्यां’शी संबंधित अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी जरंगे यांनी केली आहे.
जरांगे उपोषणादरम्यान म्हणाले, रामायणात भगवान हनुमानाने आपल्या शेपटीने लंकेला आग लावली होती. या आंदोलनात माझा मृत्यू झाला तर मराठे महाराष्ट्राचे लंकेत रुपांतर करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जरांगे यांचा सरकारवर फसवणूकीचा आरोप –
जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर ‘नात्यां’शी संबंधित अधिसूचनेची अंमलबजावणी न करून आणि मराठा आंदोलकांवर गेल्या वर्षी आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे न घेऊन मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. दरम्यान, बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी बंदही पाळण्यात आला होता.