शिराळा -शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 422 मोटारसायकली व 102 चारचाकी वाहने तर चार विनापरवाना दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात तसेच राज्यात संचारबंदी लागू केली आहे.
अत्यावश्यक व गरजेच्या सेवा वगळता इतर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आमच्या पथकांनी दि. 23 मार्च ते दि. 22 एप्रिल 2020 या कालावधीमध्ये 422 मोटरसायकलीपैकी 57 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. तर 102 चारचाकी वाहनांपैकी 3 वाहने जप्त केली आहेत. उरलेल्या वाहनांवर प्रतिबंधात्मक कारवाई, दंड करून चालकास समज देऊन सोडण्यात आलेले आहे.
विनापरवाना दारू विक्री करणारे प्रदीप निकम, गोरख निकम दोघे रा. शिराळा, सतीश चरापले, अमर जाधव दोघे रा. मांगले, भालचंद्र म्होप्रेकर रा. मानकरवाडी, शिवाजी सावंत रा. शेडगेवाडी या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच मास्क न वापरता रस्त्यावर फिरणाऱ्या 39 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मॉर्निंग वाकला जाणाऱ्या 143 लोकांना नोटिसा देऊन परत मॉर्निंग वॉकला न येण्याच्या अटीवर सोडून देण्यात आलेले आहे. मोबाईल शॉपी, पान शॉप व गिफ्ट सेंटर, ज्योतिषी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करून बाहेर जिल्ह्यातून व पुण्या मुंबईवरून आलेल्या नऊ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
मुस्लिम बांधवांनी धार्मिक विधी घरीच पार पाडावे
पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर दि. 25 एप्रिलपासून मुस्लिम बांधवांचा रोजा व इतर धार्मिक कार्यक्रम सुरू होत आहेत. या काळात मुस्लिम बांधवांनी सर्व धार्मिक विधी व इतर कार्यक्रम आपल्या घरी राहून करावयाचे आहेत. कोणीही बाहेर धार्मिक स्थळाच्या ठिकाणी प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर शनिवार दि. 25 एप्रिल रोजी असणारी पारंपरिक शिवजयंती देखील शिवभक्तांनी घरीच साजरी करावी. वरील कार्यक्रम करत असताना कोणी सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवला आदर्श….
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाणे हद्दीतील 53 गावांमध्ये सुमारे 120 कुटुंबांना 52 हजार रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे यांनी देखॅल आपला वाढदिवस साजरा न करता परिसरातील 11 कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत देऊन समाजापुढे एक अनोखा आदर्श ठेवला आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.