वाहनांना लावले जॅमर ः “दै. प्रभात’च्या वृत्ताची वाहतूक पोलिसांनी घेतली दखल
सोरतापवाडी (वार्ताहर) – पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका ते उरूळी कांचनपर्यंत बेशिस्त वाहन चालकांवर लोणी काळभोर पोलिसांनी धडक कारवाई करत वाहतुकीस अडथळा करणाऱ्या 91 वाहनांवर जॅमर लावून 37 हजार 800 रुपये दंडात्मक कारवाई केली. या संदर्भात “दैनिक प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेत कारवाई केली
आहे.
एलाईट चौक ते तळवाडी चौकापर्यंत अनेक बॅंका, ऑफिस, दुकाने आहेत. त्यांना पार्किंगची सोय नसल्याने ग्राहक रस्त्यावर गाडी लावत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. उरूळी कांचन येथील चौकात तर नागरिक रस्त्यावर गाडी लावून बिनधास्त फिरत असतात. कुंजीरवाडी चौक, लोणी स्टेशन चौक, राजबाग कॉर्नर अशा ठिकाणी रस्त्यावर गाड्या लावल्याने वाहतुकीला अडथळा येत होता. त्यानंतर लोणी काळभोर वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली.
पोलीस हवालदार मुकुंद रणमोडे, पोलीस नाईक संदीप देवकर, पोलीस नाईक संतोष शिंदे, ट्रॅफिक वार्डन सुशांत वरळीकर, सागर बरकडे, सागर राऊत यांच्या पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका ते उरूळी कांचनपर्यंत धडक कारवाई करत या भागात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या 91 वाहनांवर जॅमर लावून 37, 800 रुपये दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची आतातरी सुटका झाली, असे म्हणता येईल. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त करून वाहतूक शाखेचे अभिनंदन केले आहे.
रस्त्यावरील पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. मालकांना नोटीस दिल्या असून कार्यालय सोडून रस्त्यावर वाहन पार्किंग केले तर कारवाई नक्की करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून महामार्ग मोकळा ठेवावा.
सूरज बंडगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर