कामगारांच्या पगारावर आचाऱ्याचा डल्ला

पिंपरी- कंपनीच्या वतीने जेवण बनवण्यासाठी ठेवलेल्या आचार्याने कंपनीतील कामगारांच्या पगारासाठी ठेवलेले 60 लाख रुपये “लॉकर’मधून चोरून नेले. ही घटना महिंद्रा ऍटिया, नेहरूनगर, पिंपरी येथे बुधवारी (दि. 28) दुपारी घडली.

अनोदकुमार राजकुमार यादव (वय 28, रा. कुमाडांडा, सदरापूर, बाराबंकी, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत अजित संजयकुमार राजहंस (वय 31, रा. महिंद्रा ऍटीया, नेहरूनगर, पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. 29) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एल ऍण्ड टी कन्स्ट्रक्‍शन कंपनी स्मार्ट वर्ल्ड ऍण्ड कम्युनिकेशन डिव्हिजनमध्ये नोकरी करतात. फिर्यादी आणि त्यांचे अन्य तीन सहकारी इंजिनिअर यांच्यासाठी कंपनीमार्फत जेवण बनविण्यासाठी आरोपी यादव याला आचारी म्हणून नेमले होते. आरोपी यादव हा फिर्यादी यांच्याच फ्लॅटवर राहत असे. दरम्यान फिर्यादी यांनी कंपनीतील कामगारांच्या पगारासाठीचे 60 लाख रुपये त्यांच्या बेडरूममध्ये लाकडी कपाटात लॉकरमध्ये ठेवले होते. बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपीने बनावट चावीने कपाट आणि लॉकर उघडून 60 लाख रुपये चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.