पुणे- कोंढवा येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीस आठ तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका तडीपार असलेल्या गुन्हेगाराने हा खून केला होता. सिध्दार्थ उर्फ धुमाळ मनोज शिरसवाल (28, रा.सोलापूर बाजार, वानवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
तर अजय दादू खुडे (31,रा.कासेवाडी, भवानी पेठ) असे मृताचे नाव आहे. खुडे हाही सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात चोरीचे तीन व बंडगार्डन पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल होता. तर शिरसवाल याला वानवडी पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानूसार 1 जून 2020 रोजी एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अजयचा मृतदेह गुरुवारी सकाळी कोंढवा येथील पाण्याच्या टाकीजवळ बेवारस अवस्थेत आढळला होता. कोंढवा पोलिसांनी त्याच्या ओळख पटवल्यावर आरोपीचा माग काढण्यासाठी पथक तयार केले होते.
दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे व तपास पथकातील पोलीस कर्मचारी अमित साळुंखे, ज्योतीबा पवार व आदर्श चव्हाण यांना अजयचा खुन करुन सिध्दार्थ शिरसवाल हा जांभुळमळा येथील कॅनोलजवळ लपून थांबल्याची खबर मिळाली होती.
त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. सिध्दार्थ व अजयचे पुर्वीपासून वाद होते. अजयने सिध्दार्थची अनैतीक संबंध असल्याची बदनामीही केली होती. याकारणाने खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उप आयुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, स्वराज पाटील, पोलीस कर्मचारी अनंत भोसले, अमित साळुंखे, निलेश वणवे, संजीव कळंबे, सुशिल धिवार, ज्योतील पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे, किरण मोरे यांच्या पथकाने केली.