पिरंगुट- लवळे (ता. मुळशी) येथील खून प्रकरणातील सहा माहिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून पाठलाग करून पकडले. महेश बाळासाहेब गावडे (वय 31, रा. लवळे ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी लवळे येथे जुन्या भांडणाच्या वादातून व टोळी वर्चस्वातून प्रतीक प्रकाश सातव याचा खून झाला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना आरोपी महेश बाळासाहेब हा सिम्बॉयोसिस कॉलेज, लवळे येथील मुख्य इमारतीजवळील ड्युटी रूम येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
सिम्बॉयोसिस कॅम्पस शेजारील डोंगरात पळून जात असता त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्ता जगताप, हवालादर रौफ इनामदार, पोलीस नाईक लियाकत मुजावर, पोलीस शिपाई सुधीर अहिवळे, बाळासाहेब खडके यांच्या पथकाने ही कारवाई केली. या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पौड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.