करोनाच्या साथीमुळे सगळ्याच गोष्टी थांबल्या आहेत. नवीन सिनेमा रिलीज होत नाही आहे. शूटिंग होत नाही आहे. एवढेच नव्हे तर जे सेलिब्रिटी या वर्षी लग्न करणार होते, त्यांचे लग्न देखील पुढे ढकलले गेले आहे. लग्न पुढे ढकलले गेल्यामुळे वैतागलेल्या सेलिब्रिटीजमध्ये ऋचा चढ्ढा आणि अली फजल हे देखील आहेत. लग्न पुढे ढकलावे लागल्याचा राग ऋचा चढ्ढाने सोशल मिडीयावर व्यक्त केला आहे.
तिने एक मीम शेअर केले आहे. त्यामध्ये 2020 हे वर्ष “मनहूस’ असल्याचे मत व्यक्त केले आहे. करोनामुळे लागू केलेल्या निर्बंधात लग्न समारंभात केवळ 50 जण सहभागी होऊ शकतात. त्यानंतर तिने “गॅंग्ज ऑफ वासेपूर’मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात नगमाचा निकाह सरदार खान बरोबर होताना दिसते आहे. या सिनेमामध्ये ऋचा चढ्ढाने नगमाचा रोल केला होता. “गॅंग ऑफ वासेपुर’ 22 जून 2012 ला रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज झाल्याला 8 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेखही ऋचाने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. या सिनेमाला “द गार्डिएन’ने शतकातील सर्वश्रेष्ठ सिनेमांमध्ये स्थान दिले होते.