पुणे – स्वयंपाकाच्या बहाण्याने घरी बोलावून मूकबधिर तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून तब्बल दहा वर्षांनंतर मूकबधिर तरुणाची सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी निर्दोष मुक्तता केली.
घटना घडल्यानंतर एक वर्षाहून अधिक विलंबाने फिर्याद दिल्याच्या विषयावरून न्यायालयाने हा निकाल दिला. यात 20 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार 30 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. आरोपीच्या वतीने न्यायालयात ऍड. गणेश भूमकर यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड. योगेश बाविकर, ऍड. मिलिंद डोंबे आणि ऍड. बंटी गायकवाड यांनी सहकार्य केले.
“ही खोटी केस आहे. 8 वेळा अत्याचार केल्याचे पीडितेने म्हटले आहे. मात्र, हा प्रकार कोठे घडला, हे तिला सांगता आले नाही. घटना घडल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळाने तिने फिर्याद दिली आहे. त्यामुळे त्याला सोडण्यात यावे,’ असा ऍड. गणेश भूमकर यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. “15 जानेवारी 2009 रोजी पत्नी गावी गेल्याने स्वयंपाकाच्या बहाण्याने बोलवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार अत्याचार केला,’ अशी फिर्याद तिने 15 जानेवारी 2010 रोजी भोसरी पोलिसांत दिली.
मध्यस्थाची मदत
आरोपी आणि फिर्यादी दोघेही मूकबधिर असल्याने न्यायालयाला या प्रकरणात कामकाज करणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर मूकबधिराची भाषा समजत असलेल्या मध्यस्थाच्या माध्यमातून न्यायालयाने दोघांचे म्हणणे जाणून घेतले.