सांगली – डॉ. अरुण रामभाऊ मोराळे (वय.65,रा. कोल्हापुर, मुळ वडजी, ता.वाशी जि. उस्मानाबाद) यांचा शुक्रवारी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत हा अपघात झाला. अरुण मोराळे हे ठाणे शहरचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांचे मोठे बंधु होत. शुक्रवारीच रात्री उशीरा त्यांच्यावर मुळगाव वडजी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.
डॉ. मोराळे शुक्रवारी सकाळी मोटारीने कोल्हापूरहून लातुरला निघाले होते. त्यांचा चालक सोहेल शेख गाडी चालवत होता. रस्त्याचे काम अपुर्ण असल्यामुळे सोहेलच्या लक्षात आले नाही. भरधाववेगातील मोटार पलटली. त्यामध्ये डॉ. मोराळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी हे डॉ. मोराळे यांचे मुळ गाव. वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर कोल्हापुरलाच त्यांनी आपली कर्मभूमी बनवले. मात्र या काळात देखील त्यांनी गावाची नाळ कधी तुटू दिली नाही. प्रत्येक वर्षी गावातील सार्वजनिक कार्यक्रमात ते उपस्थित असत.
शेती आणि मातीची नाळ देखील त्यांनी जपली. डॉ. मोराळे यांनी कोल्हापुरातील सीपीआर कसबा बावडा सेवा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. विविध प्रकारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील त्यांनी सेवा केली. निवृत्तीनंतर कोल्हापूरात त्यांनी रुग्णालय सुरू केले. अतिशय अल्पदरात ते सेवा देत होते.नुकताच त्यांनी 108 रुग्णवाहिकेचे नोडल ऑफिसर म्हणून पदभार घेतला होता. त्यांच्या पश्चात्या पत्नी, मुलगा, मुली, नात असा परिवार आहे.