जयपूर – दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर नौगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. यामध्ये राजस्थानचे माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला, तर मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले. दोघांवर अलवर येथील सोलंकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या कारचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर बडोदामेव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांनाही उपचारासाठी अलवर येथे रेफर करण्यात आले आहे. मानवेंद्र सिंग कार चालवत होते आणि त्यांच्या शेजारच्या सीटवर त्यांची पत्नी चित्रा सिंह बसली होती. मानवेंद्र यांचा मुलगा हमीर सिंग आणि चालक मागच्या सीटवर बसले होते.
हे कुटुंब दिल्लीहून जयपूरला जात होते –
बाडमेरचे माजी खासदार मानवेंद्र सिंह पत्नी चित्रा आणि मुलगा हमीर सिंह यांच्यासह दिल्लीहून जयपूरला जात होते. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील 82.8 किमी रसगन आणि खुशपुरी दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पुलाच्या भिंतीला कार धडकली. या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. तर मानवेंद्र सिंह आणि त्यांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांनाही तत्काळ अलवर येथील सोलंकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चित्रा सिंह यांचा मृतदेह राजीव गांधी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. तर मानवेंद्र सिंह, त्यांच्या मुलावर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताच्या कारणाचा तपास सुरु –
अतिरिक्त एसपी तेजपाल सिंह यांनी सांगितले की, हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच जखमींना तातडीने अलवर येथे उपचारासाठी आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी चित्रा सिंह यांना मृत घोषित केले. तर इतरांची प्रकृती चिंताजनक आहे. कार चालवणाऱ्या चालकावर बडोदा येथे उपचार सुरू आहेत. पण त्यालाही अलवरला हलवण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजप आणि काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते रुग्णालयात पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.