नवी दिल्ली – देशभरातील अपघातांचे प्रमाण करोना काळात कमी झालं होतं. मात्र आता पुन्हा अपघातांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशाच महामार्गावरील एका अपघातात माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागला.
मेघालयच्या री-भोई जिल्ह्यात ही घटना घडली आहे. महामार्गावर कारला लागलेल्या भीषण आगीमध्ये माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. मेघालयचे माजी मुख्यमंत्री ई. के. मावलोंग यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्डिनँड बंशानलांग लिंगदोह असं दुर्घटनेतील मृत व्यक्तीचं नाव आहे. ते काँग्रेसचे आमदार जॉर्ज लिंगदोह यांचे बंधु होत.
मृत लिंगदोह हे इम्फाळमधील केंद्रीय कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. राष्ट्रीय महामार्गावर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. कारला नेमकी आग कशी लागली? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नसून पोलिसांकडून आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.