बर्लीन (जर्मनी) : करोनावरील औषधाच्या मानवावरील देशातील पहिल्या चाचणीस जर्मनीत मान्यता देण्यात आली. जर्मन जैवतंत्रज्ञान कंपनी बायोंटेक आणि अमेरिकन दिग्गज पिफायझर यांनी विकसित केलेल्या आरएनए लशीची मानवी कार्यकर्त्यांवर चाचणी घेतली जात आहे, अशी माहिती जर्मनीच्या नियामक मंडळाने दिली.
द पॉल इर्लिच इन्स्टिट्यूटमध्ये ही पहिली चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मानवावर औषधाच्या चाचणीला मिळालेली ही चौथी परवानगी आहे. हे लवकरात लवकर लस उत्पादन करण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे, असे इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.
या लशीचा वापर केल्यानंतर बाधिताला होणारा लाभ आणि संभाव्य धोका यांचा विचार करून ही मंजुरी दिली आहे. या चाचणीसाठी 18 ते 55 वयोगटातील 200 जणांची निवड करण्यात आली आहे. या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात करोनाच्या बाधेमुळे अतिधोकादायक टप्प्यात असणाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.
इन्स्टिट्यूट अथवा औषधांच्या उत्पादकांनी ही चाचणी कधी सुरू होणार याची नेमकी तारीख जाहीर केली नाही. मात्र, बायोंटेकने ही चाचणी लवकरच आणि अपेक्षेपेक्षा लवकर घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इन्स्टिट्यूटने करोनावरील पुढील टप्प्यातील काही चाचण्या येत्या काही महिन्यात घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.