नागपूर – शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांची उपमा दिली. त्यावर हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत. पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरले आहेत.
तुम्हाला माहितीय, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात, तेव्हा-तेव्हा विजय मोठा असतो. हे जेवढ्या शिव्या देणार, तेवढे लोकं मोदींवर प्रेम करणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून एक केलेले काम दाखवावे. मुंबईत पंचवीस वर्षे महानगरपालिका होती, त्यांनी केलेले एक काम दाखवावे.
त्यांना तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय काही जमत नाही. त्यांचे भाषण ठरलेले आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण जसेच्या तसे मी म्हणून दाखवू शकतो, असेही त्यांनी म्हटले.
फडणवीस म्हणाले की, आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर नागपुरातल्या प्रसिद्ध टेकडी लाइन हनुमान मंदिरात दर्शन घेतले बजरंग बली बुद्धी, शक्ती देतात.
त्यामुळे त्यांच्याकडे शक्ती मागितली. जी काही आपल्या राज्यावर, देशावर संकट येतात, ती दूर करण्याची प्रार्थना केली. बुद्धी आमच्याकरीता आणि विरोधकांकरीता सूबुद्धी मागितली.