फरार आरोपी नित्यानंद याचा पासपोर्ट रद्‌द

नवी दिल्ली  – बलात्कार आणि फसवणुकीचा आरोपात फरार असलेला स्वयंघोषीत बाबा स्वामी नित्यानंद सरकारने मोठा दणका दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात नित्यानंद हा नेपाळमार्गे विदेशात पळून गेल्याची माहितीही पुढे आली आहे. यानंतर परराष्ट्रमंत्रालयाने नित्यानंदचा पासपोर्ट रद्द करण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली. याबाबत विदेशातल्या सर्व भारतीय दुतावासांना कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे नित्यानंदभोवतीचा चौकशी यंत्रणांचा फास आता आवळला जाणार आहे.

दक्षिण अमेरिकेतला देश असलेल्या इक्वाडोरमध्ये नित्यानंदने एक बेट घेऊन “कैलासा’ या हिंदू राष्ट्राची स्थापना केल्याची घोषणा केली होती. मात्र आता इक्वाडोरने नित्यानंदला आश्रय दिल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. त्याचबरोबर त्याला जमीन घेण्यासाठी सरकारने कुठलीही मदत केली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नित्यानंद आता इक्वाडोरमधून हैतीत गेला असल्याची माहिती समजते.

दरम्यान, 2010मध्ये एका अभिनेत्रीसोबतचा त्याचा अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कर्नाटकमध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्याला अटकही झाली होती. तसेच त्याविरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.