डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार – उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) – महापरिनिर्माण दिनाचे औचित्य साधत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. या घोषणेनंतर आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमिवर जल्लोष केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, खासदार राहूल शेवाळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रविण परदेशी आदि उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

चैत्यभूमी येथून उद्धव ठाकरे यांनी थेट परळ येथील डॉ. बाबासाहेब राहत असलेल्या निवासस्थानाला भेट दिली. बीआयटी चाळीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 50, 51 मध्ये डॉ. बाबासाहेब राहत असत. याठिकाणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणी बुद्धवंदना घेण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोल्यांमध्ये जाऊन तेथे जतन करण्यात आलेल्या वस्तू तसेच छायाचित्रांचीही माहिती घेतली.

डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्यामुळे ही वास्तू एक महत्त्वाचे वारसास्थळ ठरली आहे. त्यामुळे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याची आवश्‍यकता असल्याचे मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरूवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)